रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Tuesday, August 18, 2020

आठवणीतला पोळा सण...

माझ्या आठवणीतला पोळा सण
    मी शालेय जीवनात असताना मला कायम श्रावण महिन्याची आतुरता असायची कारण श्रावण महिना म्हणजे सणाची रेलचेल असलेला महिना श्रावणी सोमवार, नागपंचमी ,रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, बैलपोळा अशा अनेक सणाचा उत्सव असायचा. त्यात जास्त आस असायची बैलपोळा या सणाची .... या दिवशी शाळेला सुट्टी असायची.जर शाळेला सुट्टी नसेल तर आम्ही भावंड शाळेला दांडी मारायचो. 
     पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा सण ग्रामीण भागात व शेतकरी कुटुंबात मोठ्या पातळीवर साजरा केला जातो, ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.मला आठवतय आमच्या परिसरात सर्वात मोठा बाजार हा दर बुधवारी मिरजगाव येथे भरला जात असे.पोळा सणाच्या अगोदर जो बुधवार येईल त्या बाजारात सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव बाजारात गर्दी करायचे. पोळा सणाच्या अगोदरच्या दिवशी खूप काही कामे उरकून घेतली जात असत. आमच्या घरी असलेला  गुरांचा गोठा दगड मातीचा व पत्रा या पद्धतीचा होता. व  आमचे कुटुंब एकत्रित असल्यामुळे घरातील सर्व स्त्रिया त्याच्या भिंती पांढऱ्या मातीचा वापर करून कापडाने  रंगवत असत. त्यामुळे गोठ्याचे रूप अगदी उठून दिसायचे. सणाच्या दिवशी आम्ही सर्व चुलत भावंड एकत्रिपणे काऊ चा वापर करून गोठ्यामध्ये सुंदर नक्षीकाम व विविध प्रकारची चित्रे काढायचो. त्या वेळी चित्र काढण्याचा आनंद मनाला खूप प्रसन्नता द्यायचा.आताच्या काळात मुलांना चित्रकला वही, रंग, ब्रश खूप सार आहे परंतु पूवी गोठा रंगण्यासारखा आनंद त्यात नाही. 
       हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. या  दिवशी बैलाच्या खांद्याला/वशिंड याला  (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग)  हळद व तुपाने डालडा चोळून शेकवतात त्याला खांदे मळणी असे म्हणतात.खांदे मळणी केल्यामुळे वर्षभर बैलाने जे कष्ट केलेले असते त्याला आयुर्वेदिक औषधी म्हणून हळद त्या भागावर चोळली जाते.त्यामळे खांद्याला आराम भेटत. 
           बारा महिने शेतीत राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी विश्रांती असायची.सकाळी सकाळी आई बाजरीच्या भाकरी थापायची व त्यामध्ये गुळ व तूप मिसळून त्या भाकरीचे मोठे गोल गोल गोळे तयार करून ते बैलांना खाऊ घालत . त्यानंतर ओली चारावैरण बैलांना खाऊ घालायचे . बांधाबांधाने ओल्या हिरव्या टवटवीत गवतावर बैलांना चरू द्यायचे. चरून कुस फुगवून तट्ट झालेले बैल हुंदडायचे, मस्तावायचे, उंचवटा पाहून शिंगांनी माती उकरायचे. मग बैलराजा नदीनाल्याच्या नितळपाण्यात पोहायला सोडायचे. त्या बैलांचं शरीर ब्रश साबण लावून घासून काढले जात असत..बैलांची अंघोळ झाली की बैलांना सजवायला सुरुवात व्हायची.बैल रंगविणे खरी मज्जा असायची. त्यासाठी सकाळी लवकर वाटीत वेगवेगळे रंग भिजत घेतले जायचे. साधारणपणे तीन च्या दरम्यान बैल रंगविण्यास सुरुवात केली जायची. बाजरीचे कणीस,एरंडाच्या पानाच्या काड्याचा वापर करून वेगवेगळी नक्षी बैलाच्या पाठीवर काढली जात.. ज्यांना शक्य नसायचे ते फक्त गोल आकाराची ठिपके फुंकणीचा वापर करून काढत..त्या दिवशी नवीन कासरा ,नवीन म्होरकी, गोंडा, चमचमणारी शिंगं खुलून दिसायची. शिंगांवर  हिंगुळ लावून  छंबीगोंडा, चेहऱ्यावर म्होरकी,गळ्यात खुळखुळणारी चंगाळ, घाटी, घुंगरू, घोगर, घंटी, नाकात नवी वेसण ,पायात पैंजण, अंगावर झूल, उघड्या अंगावर रंगीबेरंगी ठिपके, गोंड्याची शेपटी असा सजलेला, जसा नवरदेव गावाच्या शिवेवर आणला जात व त्यानंतर वाजत गाजत मारुतीच्या मंदिरा समोर सर्व बैलजोड्या वाजत गाजत आणल्या जात.सर्वात पुढे बैलजोडी ठेवण्याचा मान हा बदलून दिला जायचा त्यामुळे वादविवाद होत असायचे.काही गावात यावरून वाद व्हायचे. मारुतीच्या मंदिराभोवती बैलानी जोडीसह प्रदक्षिणा घातल्यावर पोळा गाववेशीतून बैलपोळा फुटला जायचा मग देवळासमोर दर्शन घेऊन, देवाला फटाके व तोफांची सलामी देऊन  मिरून बैलं आपल्या घरी आणले जायचे. घरधणीन (मालकीण) ताट-निरंजन ओवाळून हळदी कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करायची. ‘अशीच साथ दे धन्याला. बरकत येवू दे सालोसाल. बळीचं राज्य होऊ दे.’ पुरणपोळीचा घास भरवून, सुपातलं त्याला चारून, पायांवर पाणी वाहायची. नारळ फोडून प्रसाद वाटायची. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा उपवास असतो. गोठ्यात बैलांना चारावैरण केल्यानंतर पाहुण्यासह गोडधोड खाऊन उपवास सोडला जाई.  
   आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्यामुळे शेती करण्यासाठी ट्रक्टर या  यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे बैलाचे प्रमाण कमी झाले आहे.तरीपण ज्या शेतकऱ्यांना ट्रक्टर घेणे शक्य नाही त्यांनी बैलांचा सांभाळ केला आहे. काही शेतकरी प्रतीकात्मक म्हणून मातीच्या बैल आणून त्याची घरोघरी पूजा करतात. येणाऱ्या पिढीला या सर्व गोष्टी पुढे केवळ चित्रातून सांगाव्या लागतील.

शब्दांकन :-
श्री सचिन गारुडकर सर 
मो- 8600436383
(मु.पो.चिंचोली रमजान ता.कर्जत जि.अहमदनगर)

(सध्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव ता.श्रीगोंदा येथे कार्यरत आहे.)