रयतशिक्षण संस्थेचे,
श्री छत्रपती शिवाजीविद्यालय,घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
असावी सुंदर अशी एक शाळा
ओढ लागे जिची प्रत्येक बाळा
असावा असा एक गुरू
ज्ञानदानाचा असे तो कल्पतरू
मनुष्याला ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवते ती संस्था म्हणजे शाळा. देशाची
अर्थव्यवस्था बदलण्याच्या दृष्टीने, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने
आणि समृद्धी प्राप्त करण्याच्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण हे प्रवेशद्वारा सारखेच
महत्वाचे आहे.माध्यमिक शिक्षण हे देशांतील युवकांसाठी कामाचे द्वार खुले करते आणि
देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावते. हाच उदात्त विचार उराशी
बाळगून महाराष्ट्रातील एक थोर समाज सेवक थोर शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव
पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
विचारांना आदर्श मानून १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे
बोधचिन्ह असलेल्या वटवृक्षाची मुळे महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रूजून ती संपूर्ण
महाराष्ट्रात पसरली. अशा रयत शिक्षण संस्थेच्या एकूण ७८४ शाखा असून त्यातीलच एक
फांदी आमच्या अ.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे रुजली. हे गाव
म्हणजे सुमारे ५००० लोकवस्तीचे टुमदार गाव. सीना धरणाच्या काठावर वसलेल्या या
आगळ्या- वेगळ्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक प्रभू श्रीरामाचे मंदिर व सय्यद बुवा साहब यांचा
दर्गा या मंदिराची व दर्ग्याची एकच सामाईक
भिंत असून ती बंधुभावाचा संदेश देते.
तुम राम कहो,वो रहीम कहें,
दोनों की गरज अल्लाह से हैं;
तुम दीन कहो,वो धर्म कहें,
मंशा तो उसी की राह से हैं l
या गावातील अधिकांश लोक शेती करत असून अनेक व्यक्ती
राष्ट्र संरक्षण सेवेत कार्यरत आहेत.
अशा या
पावनभूमीत १९६१ साली श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली
गेली. त्यावेळी या शाळेत इ.८ वी ते १० वी
पर्यंतचे ३८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज ५७ वर्षांचा कालखंड लोटल्यानंतर या शाखेचा
आमूलाग्र बदल घडत आज येथे एकूण जवळपास १००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तसेच १९८३
साली ज्युनिअर कॉलेज ५ विद्यार्थी संख्येपासून सुरु होऊन आज कला व विज्ञान शाखेत २००
हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत
आहेत.कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक प्रमाणात आहे
म्हणजेच येथे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला जातो हे दिसून येते.विद्यालय स्थापने
नंतर अनेक अडचणींतून वाट काढत आज
श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाची भव्य दिव्य इमारत दिमाखात उभी आहे.त्या
काळात कै. संभाजी बोरुडे गुरूजी, कै. सहादू भोस, कै. संभाजी शेटे, कै. गुलाबभाई
शेख यांच्या सारख्या अनेक मान्यवरांनी या शाखेची पायाभरणी केली.श्री.नामदारभाई शेख
यांनी कै.गुलाब भाई शेख यांच्या स्मरणार्थ शाळेला २ एकर जागा उपलब्ध करून दिली.या
विद्यामंदिराच्या पायाभरणीसाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले अशा सर्वच मान्यवरांची
ही शाळा शतशः ऋणी आहे.
 |
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव भव्य,आकर्षक व सुसज्ज इमारत |
निज देहाचे झिजवून चंदन
तुम्ही वेचिला येथे कण कण
आणि फुलविले हसरे नंदन
स्मृतीस तुमच्या शतशःवंदन
आज
विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री.ढुस एस.के.,पर्यवेक्षक श्री.थोरात
ए.आर.यांच्यासह एकूण ४१ रयत सेवक या ठिकाणी अध्यापनाचे काम पूर्ण निष्ठेने पार
पाडत आहेत.या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे जणू काही पाखरेच! जी वेगवेगळे
घरट्यांतून आकाशाला गवसणी घालण्यासाठी या वटवृक्षाजवळ येऊन विसावतात आणि ज्ञानाची
शिदोरी घेऊन उत्तुंग भरारी मारतात. त्यामध्ये
घोगरगाव पंचक्रोशीतील मांदळी, चिंचोली रमजान, कोंभळी, खांडवी, रुईखेल,
बांगर्डे, बनपिंपरी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी अशा अनेक ठिकाणाहून आलेल्या
चिमुकल्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे कार्य ही शाळा करते.
प्रार्थनेस अंगणी, जातो आम्ही रमुनी,
प्रारंभ निशीदिनी,शालामातेस नमुनी,
ब्रीद एकच शिस्तीचे,स्वयंशिस्त पाळा,
सर्वांहून निराळी अशी आमुची शाळा.
आमच्या शाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य
म्हणजे ‘रयत गुरुकुल प्रकल्प’ हा प्रकल्प ऐच्छिक असून लोकसहभागातून
राबविलेला सहशालेय उपक्रम आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत सन २०१३-१४ या
शैक्षणिक वर्षापासून हा प्रकल्प विद्यालयात सुरु करण्यात आला.या प्रकल्पांतर्गत
इ.५ वी ते १० वी अखेर एकूण ३८६ विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत.यामध्ये
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,स्पोकन इंग्लिश , क्षेत्रभेट व सहल, प्रश्नमंजुषा
स्पर्धा , व्याख्यानमाला , बाह्य तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आहार व आरोग्य
मार्गदर्शन , व्यवसाय मार्गदर्शन , व
भित्तीपत्रके ,विज्ञान खेळणी व उपकरणे , ग्रंथ प्रदर्शन ,वक्तृत्व व निबंध स्पर्धा
,रांगोळी व चित्रकला स्पर्धा , व विविध क्रीडा स्पर्धा या सारखे विविध उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी राबविले जातात.याशिवाय बाल आनंद मेळावा,गुरूपौर्णिमा
,हिंदी दिन ,शिक्षक दिन ,वाचन प्रेरणा दिन ,योग दिन ,थोर महापुरुषांची जयंती व
पुण्यतिथी , राष्ट्रीय सण ,वृक्षारोपण व हरित सेना ,पालखी सोहळा , कर्मवीर जयंती
सोहळा यासरखे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.शाळेचा सांस्कृतिक
कार्यक्रम हा ग्रामपंचायत कार्यालया समोर भव्य-दिव्य स्वरुपात साजरा केला जातो. हरित
सेनेच्या माध्यमातून विविध फुलझाडांनी युक्त असा शाळेचा रम्य व मनोहरी परिसर पाहता
क्षणीच नजरेत भरतो , सवाद्य व मंजुळ ध्वनींच्या तालासुरात सकाळी शालेय परिपाठ
संपन्न होतो. शालेय पोषण आहार , व राष्ट्रीय मध्यान्ह भोजन अंतर्गत
विद्यार्थ्यांना सकस , दर्जेदार व पौष्टिक असा पोषण आहार मधल्या सुट्टीत दिला
जातो.पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था , मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता
गृहे , भव्य क्रीडांगण इ.सुविधा उपलब्ध
करण्यात आलेली आहे.स्काऊट गाईड ,स्वच्छ
सुंदर शाळा सहभाग ,पर्यावरण जनजागृती यासरख्या उपक्रमातही शाळेचा नेहमीच सक्रीय
सहभाग असतो.
रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत मे
२०१६ साली जलयुक्त शिवार योजनेसाठी रयत सेवक दुष्काळ निधीच्या रकमेतून
घोगरगाव येथील चौकी नदीवरील बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून पाण्याची साठवण
क्षमता वाढविल्याने परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
गुणवत्ता वाढीसाठी स्पर्धा
परीक्षांचे आयोजन शाळेत केले जाते.त्यामध्ये स्कॉलरशिप , नवोदय ,रयत प्रज्ञा शोध
,रयत ऑलींम्पियाड ,एन.एन.एम.एस. ,एन.टी.एस.एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट इ.प्रकारच्या
बाह्य स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यालयात प्रभावी पणे केले जाते.अप्रगत
विद्यार्थी मार्गदर्शन, दत्तक पालक योजना ,साप्ताहिक व विशेष सराव चाचणी या
माध्यमातून विद्यार्थ्यांचे पारदर्शक मूल्यमापन केले जाते. गुरूकूल वर्गांसाठी
डीजीटल क्लासरूम्स उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थी अध्ययनातील बदलती
आव्हाने सहजपणे स्वीकारू लागलीत याचाच परिणाम म्हणून शाखेने आजपर्यंत मिळवलेले यश सन
२०१२-१३ पासूनचे रयत प्रज्ञा शोध २ विद्यार्थी,रयत OLYMPIYAAD १,NMMS १४, नवोदय:-३ विद्यार्थी, SCHOLARSHIP पात्र:-३५,विभागीय पातळीवर निवड
२ विद्यार्थिनी १ विद्यार्थी,राज्य पातळीवर सहभाग
१ विद्यार्थिनी , कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत उत्तर विभागाचा पहिला आदर्श
विद्यार्थी पुरस्कार पवार करण बाबासाहेब यास प्रदान करण्यात आला. सन २०१३-१४ आदर्श
मुख्याध्यापक पुरस्कार श्री.ढूस एस.के.यांना सन २०१४-१५ उत्कृष्ठ रयतसेवक पुरस्कार
श्री.पुंडे एस.ए.यांना देण्यात आला.

सन २०१५-२०१६ चा श्रीगोंदा तालुका
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार श्री.वारूळे
जी.ई.यांना देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाची उत्कृष्ठाकडे वाटचाल पाहून रयत
शिक्षण संस्थेने सन २०१६-२०१७ साली माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा रयत शिक्षण
संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक आदर्श विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत
विद्यालयाचा इ.१२ वी चा विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ९४.८७
%इतका आहे.इ.१० वी चा निकाल ९६.४०%असून ३१ विद्यार्थी ७५%च्या पुढे व २०
विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त आहेत.
१९६१ साली मंदिरात भरणारी शाळा
माजी मुख्याध्यापक श्री.कसोटे एस.जे.यांच्या काळात T – ANGLE च्या ७ वर्गखोल्या
बांधल्या. त्यानंतर श्री.कन्हेरकर टी.पी.यांनी पश्चिमेकडील २ मजली SLAB च्या १०
वर्गखोल्यांची इमारत , पिण्याच्या पाण्याची टाकी ,बोअरवेल , मुताऱ्या व शौचालय
बांधून भौतिक सुविधा निर्माण केली.विद्यमान प्राचार्य श्री.ढुस एस.के.यांनी
पश्चिमेकडील इमारत तिसरा मजला,व पूर्व - पश्चिम तीन मजली इमारत , अशा एकूण १८ सुसज्ज वर्गखोल्या बांधून पूर्ण
केल्या.स्वच्छतागृहे ,संरक्षक भिंत ,भव्य व्यासपीठ, दक्षिणेकडील प्रवेशद्वारासह
अत्याधुनिक भौतिक सुविधांसमवेत विद्यार्थ्यांची गुणवत्तेशी सांगड घालत विद्यालयाचे नाव पंचक्रोशीत नावारूपास
आणले आहे.या कामी त्यांना मोलाची साथ
देणारे व विद्यालयाच्या जडणघडणी मध्ये सिंहाचा वाटा उचलणारे अहमदनगर जिल्हा
परिषदेचे माजी अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य मा
श्री.बाबासाहेब भोस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची प्रगतीचा आलेख उंचावत
आहे. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री.तुकाराम पाटील उगले,श्री.नामदार भाई शेख तसेच
विद्यमान सरपंच श्री.बाळासाहेब उगले ,उपसरपंच श्री.सुरेशराव तरटे ,माजी सरपंच
डॉ.दिलीपराव भोस डॉ.सुधीर गुंजाळ ,डॉ.शिवराज धामणे ,माजी न्यायाधीश श्री.नारायणराव
भोस ,श्री.सुधीर शेटे Adv.श्री.सुभाष बोरूडे व इतर माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या विकासकामात
स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून योगदान दिले आहे. त्यामध्ये मा.श्री शिरीष जाधव व
अभियंता भोसले,माजी उपप्राचार्य श्री सुभाषराव उगले , एस.एस.सी.मार्च-१९९६
विद्यार्थांच्या वतीने भरीव स्वरुपात मदत करुन शाळेशी असलेले ऋणानुबंधाचे नाते
जपले आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करीत
असलेले उच्चपदस्थ माजी विद्यार्थी: - श्री वाळके सुनील पांडुरंग (शिक्षण निरीक्षक)
श्री.दाते गंगाधर पाराजी (वित्त व लेखाधिकारी) श्री.देवकाते अंबादास पोथीराम , श्री
वाळके सुभाषराव इ.
विद्यालयाचे
प्राचार्य श्री ढूस एस.के. :- शासनाच्या व संस्थेच्या नियमावलीनुसार
विद्यार्थी केंद्रित धरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचारी यांना बरोबर घेऊन शालेय व शैक्षणिक गुणवत्तेचे कामकाज व
भौतिक सुविधांचे कामकाज पूर्णत्वास नेले असून उर्वरित कामकाजामध्ये विविध
प्रयोगशाळा ,विद्यार्थ्यांना TAB सुविधा ,सर्व वर्ग डिजिटल करून गुरुकुल समवेत इतर
मुलांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत .व कामकाजाची त्या दिशेने
वाटचाल चालू झाली आहे .अत्याधुनिक क्रीडांगण, मुलांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी
उपलब्ध करून देणे तसेच कौशाल्याधीष्टीत
विकास अभ्यासक्रम सुरु करायचा आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरातील
विद्यार्थ्याच्या तुलनेत तूसभरही कमी असता कामा नये एवढीच सर्व सेवकांची तळमळ आहे
.व या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध
क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
शब्दांकन :- सचिन गारुडकर सर व मनोज शितोळे सर
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव